आषाढीवारी

इंद्रायणी काठ वारकरी भाविकांच्या गर्दीने गजबजला..।

– ज्येष्ठ, तरुण आणि चिमुकल्या वारकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहिला..

– जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात

– स्थानिक नागरिकांची गर्दी

पुणे :
सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी, कर कटावरी ठेवोनिया।

तुलसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर,तेचि रूप।।
मकर कुंडले, तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणि विराजीत।!

तुका म्हणे माझे, हेचि सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने !!

        हाती टाळ, मृदुंग आणि “ग्यानबा तुकाराम”… चा जयघोष, अशा या भक्तीमय वातावरणात जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला शुक्रवारी देहूगाव येथून सुरुवात झाली
          देहु नगरीत पालखी प्रस्थान सोहळ्यादरम्यान फक्त टाळ मृदुंगांचा गजर ऐकायला मिळत होता. मंदिर आणि परिसरात वारकरी हजारोंच्या संख्येने आले होते. मंदिरामध्ये तर जमलेल्या दिंड्यांमधील वारकरी टाळ, मृदुंग आणि ग्यानबा तुकारामांच्या जयघोषात तल्लीन झाल्याचे पहायला मिळाले.
          एरवी जिन्स पॅन्ट, टी-शर्टची भुरळ असलेली तरूणाई देहू नगरीत चक्क पारंपारिक पोशाखामध्ये पहायला मिळाली. अनेकांनी पायजमा, पांढरे शर्ट, खादीची कपडे, गळ्यात गमछा तर कोणी चक्क धोतर परिधान करून पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते.
            पालखी सोहळ्यासाठी देहु नगरीत दाखल झालेली तरूणाई सेल्फी, फोटो काढण्यात गर्ग असल्याचे पहायला मिळाले. तर कोणी सोशल मिडीयावर स्टोरी स्टेटस ठेवण्यासाठी रील्स बनवताना देखील पहायला मिळाले. तसेच, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक ड्रोनची घरघर मंदिर परिसरातील आकाशात पहायला मिळाली.

        जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी रथाला यंदा अत्याधुनिक बनवण्यात आले आहे. मंदिर प्रशासनाच्या वतीने पालखी रथाला जीपीएस लावण्यात आला आहे. त्यामुळे हा पालखी रथ पालखी मार्गावर कोठे आहे, याची एका क्लिकवर माहिती मिळणार आहे. त्यासोबतच या पालखी रथाला सीसीटिव्ही बसवण्यात आले आहेत. या सीसीटिव्हीच्या माध्यमातून पुणेकर भाविक भक्तांसह राज्यातील भाविकांना तुकोबा रायांच्या पादुकांचे 24 तास दर्शन सोशल मिडीयाच्या माध्यमातून घेता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *