पुणे : सिंहगड रस्त्यावरील धायरी मुख्य रस्त्यावर सोमवारी सकाळपासून दुपारपर्यंत अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली. बेकायदेशीर स्टॉल्स, पथाऱ्या आणि दुकानदारांनी अतिक्रमण करून बांधलेल्या लोखंडी, प्लास्टिक शेड पाडण्यात आल्या. कच्चे बांधकाम बुलडोझरच्या साह्याने पाडण्यात आले.
धायरी मुख्य रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यावर ठाण मांडून बसलेले हातगाडीवाले, पथारीवाले, भाजीविक्रेते तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू विकणारे लोक यांचा रस्त्यात अडथळा निर्माण झाला आहे. वेगवेगळ्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीचा वेग मंदावतो. तसेच भर रस्त्यात हातगाड्या, पथार्या मांडल्याने वाहतुकीसाठी अरुंद जागा उपलब्ध होऊन किरकोळ अपघातही होतात.
या पार्श्वभूमीवर अनेक महिन्यांनी धायरी मुख्य रस्त्यावर अचानक अतिक्रमण कारवाई करण्यात आली. धायरी फाटा ते रायकर नगर दरम्यान ही कारवाई करण्यात आली.ही कारवाई करत असताना अतिक्रमण विरोधी पथकासोबत पोलीस होते त्यामुळे कारवाईत फारसा व्यत्यय आला नाही. तथापि या कारवाईत राजकीय व्यक्तींशी संबंधित अतिक्रमणांना अभय देण्यात आले किंवा त्यांचे नुकसान होऊ दिले गेले नाही असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला .
कारवाई सुरू असल्याचे पाहून काही बेकायदेशीर स्टाॅलधारकांनी स्टाॅल्स कुलूपबंद करुन अतिक्रमण नसल्याचे भासवले. भारतीय जनता पक्षाशी संबंधित एका कार्यकर्त्याच्या संपर्क कार्यालयाच्या बाहेर असलेली शेड काढून टाकण्यासाठी त्याला मुदत देण्यात आली. त्याने स्वखर्चाने शेड काढून घेतली. मात्र इतर अनधिकृत विक्रेत्यांचे कच्चे बांधकाम बुलडोझरच्या साह्याने पाडण्यात आले. माजी नगरसेवकाशी संबंधित असलेल्या हॉटेल बाहेरील खासगी जागेतील पान टपरी तसेच चहाच्या टपरीवरही अतिक्रमण विरोधी पथकाने मेहरबानी दाखवल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. याबाबत दुकानदार तसेच पथारीवाल्यांतही नाराजी होती.
दरम्यान सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयातर्फे करण्यात आलेल्या कारवाईनंतर खासगी जागेतील स्टाॅल्स दुपारी जागा बदलून पूर्ववत सुरू झाले.
