नांदेड सिटीच्या हद्दीत पोलीस स्टेशन सुरू होणार .
पुणे : येत्या महिनाभरात नांदेड सिटीच्या हद्दीत पोलीस स्टेशन सुरू होणार असून धायरी तसेच खडकवासला, नांदेड, किरकटवडी नांदोशी याभागातील कामकाज याच पोलीस स्टेशनच्या माध्यमातून होणार आहे.
धायरी सारख्या गावांची लोकसंख्या लाखाच्या घरात गेलेली आहे. सिंहगड रस्ता परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे अशा परिस्थितीमध्ये ‘मनसे’च्या शिष्टमंडळाने धायरी गावात पोलीस चौकी करण्यात यावी यासंदर्भात लेखी निवेदन परिमंडळ उपायुक्त संभाजी कदम यांना दिले.
निवेदनाचा योग्य विचार करून लवकरच या भागामध्ये पोलीस चौकी होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे कदम यांनी सांगितले. तसेच संकल्पित नांदेड सिटी पोलीस ठाण्याची माहिती सांगितली. पोलीस परिसरात चांगले काम करुन कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम करतील असेही त्यांनी सांगितले.
‘मनसे ‘महाराष्ट्र सरचिटणीस गणेश सातपुते, खडकवासला मतदारसंघ अध्यक्ष विजय मते, शहर सचिव सोनाली पोकळे, वाहतूक सेना शहराध्यक्ष शिवाजी मते, तसेच महेश महाले, बाळासाहेब मंडलिक, रमेश गायकवाड, चारुदत्त लोखंडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
