वैष्णवांचा मेळा पुण्यात मुक्कामी वसला…

माऊलींची पालखी१०.३० वाजता तर तुकाराम महाराजांची पालखी ९.३०वाजता मंदिरात दाखल
– फर्ग्युसन रस्ता आणि लक्ष्मी रस्त्यावर तुफान गर्दी

पुणे :-
        टाळ-मृदंगाच्या तालावर… हाती भगव्या पताका… सोबतीला मृदूंगाची साथ अन ग्यानबा तुकाराम, ज्ञानोबा माऊलीचा जयघोष करत, वैष्णवांचा मेळा रविवारी रात्री उशीरा पुण्यात वसला. दरम्यान, प्रसिध्द असलेला लक्ष्मी रस्ता आणि फर्ग्युसन रस्ता भाविकांच्या आणि वारकर्‍यांच्या गर्दीने गजबजला होता.

भक्तिने भारलेल्या वातावरणात आनंदाने तल्लीन झालेले पालखी सोहळ्यातील वारकरी जसजसे फर्ग्युसन रस्त्याने आणि लक्ष्मी रस्त्याने जात होते. तसतशी पुणेकर भाविकांची पालख्यांच्या दर्शनाची उत्सुकता शिगेला पोहोचत होती. संत तुकाराम महाराजांची पालखी सायंकाळी पुण्यात आल्या. यावेळी येथे जणूकाही भक्तीचा सागरच उसळला. वाकडेवाडी चौकात महानगरपालिकेच्या वतीने दोन्ही पालख्यांचे स्वागत करण्यात आले. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, संघटना, सार्वजनिक मंडळांतर्फे तसेच सर्वधर्मिय नागरिकांच्या वतीने येथे वारकर्‍यांना औषधे, पिण्याचे पाणी आणि खाद्य पदार्थांच्या पाकिटांचे रविवारी वाटप करण्यात आले.

दोन्ही पालखयांची सायंकाळच्या 8 च्या सुमारास फर्ग्युसन रस्त्यावर पोहोचल्या. त्यांची आरती झाल्यानंतर त्या तेथून पुढे मुक्कामाच्या दिशेने निघाल्या. फर्ग्युसन रस्त्यावर तुकाराम महाराजांच्या मंदिरात आरती झाली. तर याच रस्त्यावर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात आरती झाली. त्यानंतर पालखी सोहळा लक्ष्मी रस्त्याने पुण्यात मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचला. रात्री 9.30 वाजता संत तुकाराम महाराजांची पालखी निवडूंगा विठोबा मंदिरात मुक्कामाला पोहोचली. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेत रात्री 10,30 वाजता पालखी विठोबा मंदिरात पोहोचली. यावेळी मंदिराच्या पदाधिकार्‍यांनी आरती करून पादूकांचे पूजन केले. दहिभाताचा नैवेद्य दाखविला. त्यानंतर रात्री उशिरा दर्शनबार्‍या सुरू झाल्या. पालखी पुण्यात दोन दिवस मुक्कामी असणार आहे.